वारकऱ्यांची सेवा करणारे वारकरी

ज्ञानेश्वर फड/प्रीतम पुरोहित
वाल्हे –
गीता भागवत करिती श्रवण।
अखंड चिंतन विठोबाचे।।
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाही ।।
वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्त्व आहे. त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी आहेत. अश्यावेळी या वारकऱ्यांची व्यवस्था करणे हे मोठे आव्हानात्मक असते. प्रत्येक दिंडीत 5-10 सेवेकरी असतात, जे दिंडी पोहोचण्याआधी पालखी तळ गाठून तेथे राहुट्या उभारणे, जेवण, पाणी व्यवस्था आदीची तयारी करून ठेवतात. अशाच एका सेवेकऱ्याच्या कार्याची ही माहिती…
माउलींच्या सोहळ्यात रथापुढे दोन क्रमांकाची खंडोजीबाबा दिंडीत संजय बबनराव दिकटे (रा.कासार आंबोली, ता. मुळशी, पुणे) हे गेली पंचवीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करतात. पूर्वी त्यांचे आजोबा रामचंद्र दिकटे, नंतर वडील बबनराव दिकटे आणि आता संजय ही सेवा करत आहेत. ते दिंडी पोहोचण्या आधी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून वारकऱ्यांच्या निवासासाठी राहुट्या ठोकणे, जेवण पाणी व्यवस्था तसेच पहाटे दिंड्या मार्गस्थ झाल्यानंतर ते सर्व साहित्य पुन्हा ट्रकमध्ये ठेवणे, वारकऱ्यांच्या ट्रकमधील पिशव्या काढून देणे, त्या पुन्हा व्यवस्थित ठेवणे, पाण्याचे टॅंकर भरून आणणे आदी सेवा करतात.
दिकटे यांची कासार आंबोली येथे शेती आहे. वारी सोहळा जवळ आला की ते लगबगीने शेतीतील सर्व कामे आटोपतात आणि माउलींच्या वारी सोहळ्यात सहभागी होतात. त्यांच्यासोबत नाना, चंदू, विजू असे भाविक सेवेकरीदेखील सेवा करतात. “आमची ही वडिलोपार्जित सेवा आहे. या दिंडीत माझ्याप्रमाणेच आणखी 12 जण ही सेवा करतात.
खंडोजीबाबा दिंडी
ही दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात रथापुढे दुसऱ्या क्रमांकावर चालते. हभप निवृत्ती महाराज हे सुरुवातीला या दिंडीचे चालक होते; सध्या हभप विजू महाराज हडके हे चालक आहेत. या दिंडीत सध्या 4 हजारांहून अधिक भाविक चालतात. त्यात प्रामुख्याने नांदेड, लातूर, परभणी, बीड, नाशिक, जळगांव, सोलापूर, पुणे भागातील वारकऱ्यांचा समावेश आहे. या दिंडीची आळंदी आणि पंढरपूर येथे धर्मशाळा आहे. तेथे त्यांची निवासाची व्यवस्था करण्यात येते.
वारकऱ्यांची सेवा करताना खूप आनंद वाटतो. दोन वर्षांनंतर आता पुन्हा सेवा करता येतेय, याचा खूप आनंद आहे. माझ्यानंतर मुलांनादेखील ही सेवा करण्यास सांगत असतो. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा या हेतूने कार्य सुरू आहे. देह आहे तोपर्यंत मी ही सेवा करतच राहणार.
– संजय बबनराव दिकटे, सेवेकरी




