युद्धाचे सायरन वाजणार ! महाराष्ट्रातील १६ ठिकाणांवर उद्या होणार मॉकड्रील

India Vs Pakistan War Mock Drill | जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील संघर्ष अधिकच वाढला आहे. पाकिस्तान विरोधात भारताने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. तर पाकिस्तानेही प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. असे असतानाच युद्धाच्या चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयानं अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी मॉक ड्रील घेण्याचे निर्देश दिले आहेत. देश स्तरावर एकूण 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील पार पडणार आहे. यापूर्वी 1971 मध्येही राज्याराज्यात मॉक ड्रील घेण्यात आलं होतं. त्यानंतर नागरिक सुरक्षिततेच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर
युद्धकाळातील उपायांचा सराव या मॉक ड्रीलअंतर्गत घेतला जाणार असून यादरम्यान नागरिकांनी युद्धजन्य परिस्थिती आणि हवाई हल्ल्यादरम्यान स्वत:चं आणि इतरांचं संरक्षण नेमकं कसं करायचं यासंदर्भातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. महाराष्ट्रातील 16 ठिकाणांवर त्याचा सराव पार पडेल. केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील होणार आहे. हे जाणून घेऊयात….
कोणत्या ठिकाणी पार पडणार मॉकड्रील?
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, उरण, तारापूर, नागोठणे, मनमानड, सिन्नर, थळवायशेत, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हे मॉकड्रील पार पडेल.
मॉकड्रीलमध्ये नेमकं काय होणार?
- हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाईल.
- हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण दिले जाईल.
- रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणं समजू नये यासाठी ब्लॅकआऊटचं प्रशिक्षण देणार आहे.
- महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येतील.
- सामान्य नागरिकांना बचावकार्याचं प्रशिक्षण दिलं जाणार
- घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचं महत्त्वं पटवून दिलं जाणार
- हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे, याचा सराव मॉकड्रीलमध्ये केला जाईल.
सायरन वाजताच काय करावे?
- सायरन वाजताच नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद करावे.
- तातडीने सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
- सायरन वाजताच इमारतीपासून दुर जावे.
- किमान 5 ते 10 मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळी जावे.
- मोकळ्या जागेपासून दूर राहा.
हेही वाचा :
मॉक ड्रील म्हणजे काय ? ; आपत्कालीन परिस्थितीत नेमकं काय करावं आणि काय नाही ? वाचा





