Arif Mohammed Khan : वक्फकडे एवढी संपत्ती आहे, मग पैसा जातो कुठे? बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा सवाल

पाटणा : वक्फ दुरूस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून देशात घमासान सुरू असताना बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनीही या विषयावर आपले मत प्रदर्शित करत एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. याकरता त्यांनी त्यांना स्वत:ला आलेला अनुभव सांगतच वक्फविषयी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. यासंदर्भात बोलताना आरिफ मोहम्मद खान म्हणाले की आपण काही काळ उत्तर प्रदेश वक्फ मंत्रालयात होतो.
त्यावेळी तेथे मी खटल्यांशिवाय काहीही पाहिले नाही. १९८० मध्ये मुस्लिम महिला संरक्षण कायदा मंजूर झाला. त्यात असे म्हटले होते की जर घटस्फोटित महिलेची काळजी घेण्यासाठी कोणी नसेल तर तिला वक्फ बोर्डाकडून भत्ता दिला जाईल. दोन वर्षांनंतर, मी संसदेत विचारले की वक्फ बोर्डाने कोणती तरतूद केली आहे आणि घटस्फोटित महिलेला भत्ता म्हणून किती रक्कम दिली जाते.
ते म्हणाले की दोन वर्षांनंतर मला उत्तर मिळाले की कोणत्याही वक्फ बोर्डाने एक पैशाचीही तरतूद केलेली नाही. वक्फ बोर्डाची अवस्था अशी आहे की त्यांच्याकडे इतकी मालमत्ता आहे आणि त्यांच्याकडे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. मग हे पैसे कुठे जात आहेत? याचा अर्थ असा की कुठेतरी काहीतरी चूक आहे आणि ती दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. ते बदलेल की नाही हे मला माहित नाही, पण बदल आवश्यक आहे.





