वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या ! चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

नागपूर – वक्फ बोर्डाने तात्कालीन कायद्याचा आधार घेत किंवा वक्फचा वापर करून हिंदू, आदिवासी व खासगी जमिनीवर अतिक्रमण केले. त्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नावाने करून घेतल्या. अशा सर्व जमिनींबाबत तातडीने योग्य ती कारवाई करून त्या ज्या व्यक्ती, मंदिर किंवा संस्थांच्या मालकीच्या आहेत त्यांना त्या परत कराव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारकडे केली आहे.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड कायद्यात तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी उच्च स्तरीय समिती किंवा प्राधिकरण गठित करावे व त्यासाठी लागणारा पैसा सरकारने खर्च करावा, अशी मागणी त्यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मतदानानंतर बुथ लेव्हलवरून जो रेकॉर्ड पाहिल्यास उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या मतदानापैकी ५१% वाटा हा मुस्लिम मतदारांचा आहे. मागील दोन अडीच वर्षांत त्यांनी जी हिंदुत्व विरोधी भूमिका स्वीकारली त्या भूमिकेतून हे मतदान मिळाल्याचा अभिमान त्यांना असेल तर ते त्यांना लखलाभ असो.
महाविकास आघाडीतील घटक दल थोड्याशा यशाने हुरळून गेले आहेत. महायुती आणि मविआच्या मतांमध्ये केवळ ०.३ टक्के फरक आहे. याचमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी उत्साह आला आहे.
पुढील पाच वर्षात मोदी सरकारच्या योजना महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेपर्यंत पोहोचाव्यावा यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खोटे बोलून जाहीर केलेले ८५०० रुपये मागण्यासाठी जनता कॉंग्रेस कार्यालयासमोर रांगा लावतील, असाही टोला त्यांना लगावला.
प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत बावनकुळे म्हणाले की, समाजात कोणत्याही प्रकारची कुठेही तेढ निर्माण होणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही सर्व काम करीत आहोत.
दंगली घडविण्याचे काम महाराष्ट्रात शरद पवारांच्या तर देशात कॉंग्रेसच्या काळात झाले आहे. भाजपच्या काळात दंगली होत नाहीत तसा विचारही कुणी करीत नाही, असा खुलासा त्यांनी केला.





