Waqf Bill: वक्फ विधेयकावर अमित शाहांचं लोकसभेत भाषण; विरोधकांच्या प्रश्नांना दिली सडेतोड उत्तरं

Waqf Bill: अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले. रिजिजू यांनी याला उम्मीद (युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट) असे नाव दिले आहे. या विधेयकाला केंद्र सरकारचा भाग असलेल्या टीडीपी, जेडीयू आणि एलजेपी यांनी पाठिंबा दिला. शिवसेना यूबीटी खासदार अरविंद सावंत यांनी त्यांच्या भाषणात हे स्पष्ट केले नाही की ते विधेयकाच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत सविस्तर भाषण दिलं. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला, मुस्लिम समाजाच्या आक्षेपांना उत्तरं दिली आणि विरोधीपक्षावरही जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या विस्तृत संबोधनात वक्फचा इतिहास, गैरसमज आणि विधेयकाचे उद्दिष्ट यावर त्यांनी भर दिला. चला, 7 मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया की, अमित शाह यांनी वक्फ बिलाबाबत नेमकं काय सांगितलं.
-वक्फ कायद्याचा उद्देश: अमित शाह म्हणाले, “वक्फ कायदा हा दान दिलेल्या मालमत्तेचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने आणि कायद्याच्या चौकटीत होतंय की नाही, हे पाहण्यासाठी आहे. दान हे इस्लाम धर्मासाठी किंवा गरीबांच्या कल्याणासाठी दिलं जातं, ते त्याच उद्देशासाठी वापरलं जातंय की नाही, यावर नियंत्रण ठेवणं हा या कायद्याचा हेतू आहे.”
-विरोधी पक्षाच्या आरोपांना प्रत्युत्तर: विरोधी पक्षावर निशाणा साधताना शाह म्हणाले, “विरोधी पक्षाकडून असा खोटा प्रचार केला जातोय की हे विधेयक मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कार्यात आणि दान दिलेल्या मालमत्तेत हस्तक्षेप करणार आहे. हे साफ खोटं आहे. अल्पसंख्याकांना घाबरवून मतपेढी मजबूत करण्याचा हा डाव आहे.”
-वक्फचा इतिहास: वक्फचा उगम सांगताना शाह म्हणाले, “वक्फ ही संकल्पना इस्लामच्या दुसऱ्या खलिफा उमर यांच्या काळात समकालीन स्वरूपात आली. आजच्या भाषेत सांगायचं तर, वक्फ म्हणजे एक प्रकारचं धर्मादाय नोंदणीकृत दान आहे. यात व्यक्ती आपली मालमत्ता किंवा जमीन धार्मिक आणि सामाजिक कल्याणासाठी दान करते, ती परत घेण्याचा हेतू न ठेवता.”
-विरोधी पक्षाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह: विरोधी पक्षाच्या नीयतीवर बोट ठेवत शाह म्हणाले, “काही खासदारांच्या मनात निर्दोषपणे किंवा राजकीय हेतूने गैरसमज आहेत. या सदनातून देशभरात भ्रामक माहिती पसरवण्याचा प्रयत्न होतोय, हे मला खेदजनक वाटतं.”
-मुस्लिम आक्षेपांना उत्तर: मुस्लिम समाजाच्या काही शंकांवर शाह म्हणाले, “वक्फ कायदा आणि बोर्ड 1995 मध्ये लागू झाला. गैर-मुस्लिमांना सामील करण्याच्या मुद्द्यावरून हस्तक्षेपाचा आरोप होतोय. पण स्पष्ट सांगतो, कोणताही गैर-मुस्लिम वक्फमध्ये येणार नाही, हे नीट समजून घ्या.”
-विपक्षावर चिमटा: विरोधी पक्षाला टोमणा मारताना शाह म्हणाले, “या लोकांना कधी मागासवर्गीयांची चिंता नव्हती, ना मुस्लिमांची. हे फक्त जातीयवाद आणि तुष्टीकरणाच्या राजकारणावर वर्षानुवर्षे चालले आहेत. कौटुंबिक राजकारणाला पुढे नेणारे हे लोक आहेत. 2014 नंतर नरेंद्र मोदींनी हे सगळं संपवून विकासाचं राजकारण सुरू केलं.”
-वक्फच्या दाव्यांवर खुलासा: शाह यांनी ठामपणे सांगितलं, “कर्नाटकात एका मंदिरावर वक्फने दावा केला होता. ख्रिश्चन समुदायाच्या अनेक जमिनींवरही असेच दावे ठोकले गेले आहेत. हे सगळं थांबवण्यासाठीच हे विधेयक आहे.”
दरम्यान, अमित शाह यांच्या या भाषणाने वक्फ बिलावरून सुरू असलेल्या वादाला नवं वळण दिलं आहे. त्यांनी विरोधी पक्षाच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देत विधेयकाचे समर्थन केलं.





