Crime News : वाॅन्टेड आरोपी बारामती पोलिसांच्या जाळ्यात
Crime News : आरोपी तेथे आल्यानंतर पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने तत्काळ पाठलाग करून झडप घालत त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली.

बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गंभीर खूनप्रकरणातील वाॅन्टेड पाहिजे आरोपी अनिकेत संजय पवार (वय २०, रा. जगतापमळा, खंडोबानगर, बारामती) हा गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल ७२५ दिवस फरार होता. या आरोपीचा सातत्याने शोध सुरू असताना पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी हा बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील माळावरची देवी जवळील जवाहर पार्क परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
प्राप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई सागर जामदार व पोलीस शिपाई विशाल शिंदे यांच्या पथकाने जवाहर पार्क परिसरात गोपनीयरीत्या सापळा रचला. आरोपी तेथे आल्यानंतर पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने तत्काळ पाठलाग करून झडप घालत त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली.
गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, बारामती शहर पोलीस स्टेशन येथे संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले (वय ३९, व्यवसाय फोटोग्राफर, रा. अहिल्यादेवी चौक, जळोची, बारामती) यांनी दिलेल्या प्रथम खबरीतील हकीकतीनुसार त्यांचा भाचा गणेश धुळाबापू वाघमोडे (वय १७, रा. जळोची, ता. बारामती) याचे सन २०२३ मध्ये टी.सी. कॉलेज परिसरात जयेश बाबासाहेब माने व त्याच्या साथीदारांशी भांडण झाले होते आणि त्या घटनेतून निर्माण झालेल्या पूर्ववैमनस्याच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापूर्वी गणेश हा मित्रांसोबत कपडे खरेदी करून जळोचीच्या दिशेने परतत असताना त्यांचा पाठलाग करण्यात आला.
जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तींनी त्यांचा रस्ता अडवून गणेशवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यानंतर नातेवाईक व मित्रांनी परिसरात शोध घेतला असता गणेश हा ओढ्याजवळील शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डोके, मान व शरीराच्या इतर भागांवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे प्रथम खबर अहवालात नमूद आहे. या घटनेवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्या २२ ऑगस्ट २०२४ पासून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ७२५ दिवस आरोपी फरार राहिला होता. इतका दीर्घ कालावधी उलटल्यानंतरही बारामती शहर पोलिसांनी त्याचा शोध सोडला नाही. स्थानिक गोपनीय माहिती, जुन्या नोंदी, आरोपीच्या संभाव्य हालचाली आणि क्षेत्रीय माहितीचा सातत्याने मागोवा घेत अखेर त्यास माळावरची देवी परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपीला अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.





