बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला मोठा वेग आला आहे. या प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येताना दिसत आहेत. या हत्या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. याचा मास्टमाईंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असून सध्या तो फरार आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी वाल्मिक कराडवर मोठा आरोप केला आहे. काय म्हणाले उत्तम जानकर? धनंजय मुंडे याचा कर्ता करविता आहे. या सगळ्या प्रकरणामागे ज्याने ताकद दिली तो तेवढाच मोठा गुन्हेगार आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतक्या खंडणी, मारामारी, खून शक्य नाही. रोज एक कोटी घेतल्याशिवाय हा वाल्मिक कराड झोपत नव्हता. हे बीडच्या सर्व लोकांना माहिती आहे. एक कोटीला एखादा हजार जरी कमी असेल तरी कोणाचे हातपाय मोडून , खून कर आणि पैसे घेऊन ये असा सांगायचा. एक कोटीला लाखभर कमी असेल तरी वाल्मिकला झोप लागत नव्हती असे उत्तम जानकर म्हणाले आहेत. वाल्मिक कराड फरार संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. एकीकडे राज्यातून या हत्येवरुन संतापाची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला या प्रकरणात अटक करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. वाल्मिक कराड सध्या फरार असून सध्या सीआयडी आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत. ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले? केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.