बीड : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड अखेर आज सकाळी पुण्यात CID ला शरण गेला. ही केस सीआयडीने हाती घेतल्यानंतर तपासाला वेग आला होता. वाल्मिक कराडच्या या आत्मसमर्पणानंतर मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाले धनंजय देशमुख? वाल्मिक कराडनंतर आता इतरही आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच संतोष देशमुख हत्येत सहभाग नव्हता तर इतके दिवस समोर का आला नाही,असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीदेखील धनंजय देशमुख यांनी यावेळी केली. वाल्मिक कराडने शरण जाण्यापूर्वी शेअर केला विडिओ सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. “मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे.” पुढे त्याने म्हंटले की, “संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे,’ असे वाल्मिक कराडने व्हिडीओत म्हटले आहे. 22 दिवसांनी वाल्मिक कराड शरण वाल्मिक कराड याच्यावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्याता यावा, अशी मागणी होत आहे. तेव्हापासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र, पोलीस किंवा सीआयडी कोणालाही वाल्मिक कराडला शोधण्यात यश आले नव्हते. अखेर 22 दिवसांनी वाल्मिक कराड शरण आला आहे.