Walmik Karad : वाल्मीक कराडच्या मुलाचा शस्त्र परवाना रद्द
बीड जिल्हा प्रशासनाने वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड (Walmik Karad) याचा शस्त्र परवाना रद्द केला आहे.

Walmik Karad : बीड जिल्हा प्रशासनाने वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड (Walmik Karad) याचा शस्त्र परवाना रद्द केला आहे. सुशील कराड याच्यावर बंदूक दाखवून एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच ही कारवाई करण्यात आली आहे.
३० ऑक्टोबर रोजी सुशील कराड यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर आणि त्यांच्या कमरेला शस्त्र लावलेली एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शस्त्र कायदा, १९५९ च्या कलम १७ अन्वये हा आदेश जारी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२० मध्ये सुशील कराड (Walmik Karad) यांना शस्त्र परवाना दिला होता. परळी शहर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत म्हटले आहे की, सुशील कराड यांनी महिलेच्या पतीला मारहाण केली, बंदूक दाखवली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले की, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शित करणे हे परवान्यातील अटी व शर्तींचे स्पष्ट उल्लंघन आहे. अशा कृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, सार्वजनिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण होतो, तसेच शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण होते, असेही म्हटले (Walmik Karad) आहे.






