Walhe Palkhi Sohala : ‘नाथ साहेबाचं चांगभलं’! वाल्हे ग्रामदैवतांचा पालखी सोहळा शाही स्नानासाठी वाईकडे मार्गस्थ
Walhe Palkhi Sohala : अधिकमासानिमित्त वाल्हे ग्रामदैवतांचा पालखी सोहळा वाईकडे रवाना; बैलगाड्या आणि वाहनांच्या ताफ्यासह हजारो भाविक सहभागी.

Walhe Palkhi Sohala – ‘नाथ साहेबाचं चांगभलं’चा जयघोष करीत, अतिशय उत्साही वातावरणात वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामदैवतांचा पायी पालखी सोहळा शनिवार (दि. ३०) रोजी वाई (जि. सातारा) येथील कृष्णा नदीवर अधिकमासाच्या शाही स्नानासाठी मार्गस्थ झाला. बैलगाड्या, ट्रॅक्टर, टेम्पो, दुचाकी, चारचाकी अशा अनेक वाहनांतून मोठ्या संख्येने भाविकभक्त वाईच्या दिशेने रवाना झाले.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ज्येष्ठांसह तरुणांमध्ये दिसत होते. रखरखत्या उन्हातही ‘नाथ साहेबांच्या नावाने चांगभलं’चा जयघोष करीत भक्त वाटचाल करीत होते. तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात वाई येथील कृष्णा नदीवर पवित्र शाही स्नानासाठी वाल्हे आणि पंचक्रोशीतील ग्रामदैवतांचा पायी पालखी सोहळा जात असतो.
शनिवारी सकाळी कुंभारवाडा व श्री संत सावता महाराज मंदिर येथून छबिना निघाला. नाथाची काठी घेऊन बाजारपेठेतून ढोल-ताशा, सनई सवाद्यसह गुलालाची उधळण करीत ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करीत ग्रामदैवत मंदिरात समाजआरती घेण्यात आली. श्री भैरवनाथ मंदिराचे पुजारी सचिन आगलावे यांनी विधीवत पुजा केली.
दुपारी पाऊणे बाराच्या सुमारास गाव वेशीवरून वाईच्या दिशेने बैलगाडीतून सोहळ्याची आगेकूच झाली. हा पालखी सोहळा वीर, वाठार कॉलनी, भादे, शिवाजीनगर मार्गे खंडाळा (जि. सातारा) येथे शनिवारी रात्री मुक्कामी असेल. रविवारी (दि. ३१) वाईकडे पालखी सोहळा मार्गस्थ होणार असून सकाळी वाईच्या वेशीवर पोहचेल.
वाई बाजारपेठेतून ढोल-ताशा, गुलाल उधळीत सवाद्य छबिना मिरवणुकीसह कृष्णा नदीवरील गणेश मंदिर घाटावर पोहचल्यानंतर ग्रामदैवतांच्या मुखवट्याच्या मूर्तींना पवित्र कृष्णा नदीच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात येणार आहे, अशी माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के, उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार यांनी दिली.





