Wakad Accident: भरधाव मिक्सर ट्रकने ई-बाईकला चिरडले; अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – भरधाव वेगात येणाऱ्या मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. ९ जानेवारी) वाकड येथील मानकर चौकात युग होंडा शोरूमसमोर घडली.याबाबत जय विद्याधर पोतले (वय २३, रा. राजयोग सोसायटी, वारजे, पुणे) यांनी शनिवारी (दि. १०) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी ट्रक चालक रामा अरुण कोळेकर (वय ४२, रा. मोहोळ, जि. सोलापूर) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे आई आणि वडील त्यांच्या ओला कंपनीच्या ई-बाईकवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील मिक्सर ट्रक भरधाव वेगाने चालवून त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या वडिलांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले, तर त्यांच्या आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





