मुख्यमंत्र्यांच्या फोनची प्रतिक्षा.! आमदार बच्चू कडूंनी व्यक्त मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा; नेमकं काय म्हणाले, पाहा…..

मुंबई – “भरत गोगावलेच नाही तर सत्ताधारी पक्षांतील अनेक आमदार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोनची वाट पाहत आहेत. एका आमदाराने उगीचच आपल्याला फोन आल्याचे सांगितले आणि त्यानंतर 4-5 जण तत्काळ दिल्लीला पळाले,’
अशा खुमासदार शैलीत प्रहार संघटनेचे नेते तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घटनाक्रमावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी आपली मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षाही बोलून दाखवली.
सध्या राजकारणात नवा पॅटर्न आला आहे. पूर्वी लोक धोतर घालायचे. आता पॅंट घालतात. तसा आता राजकारणाचाही पॅटर्न बदलत आहे. या पॅटर्नची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी विचारांशी असंगत युती केली.
त्यानंतर राज्याने दोन्ही कॉंग्रेस व शिवसेनेचा पॅटर्न पाहिला. आता शेवट भाजप करत आहे. हे सर्व लोकांना आवडत नाही, असेही बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसला फोडण्याची गरज नाही, कारण त्यांचे बहुतांश आमदार स्वतःहून येण्यास तयार आहेत, असेही स्पष्ट केले.
सत्तेसाठी विचार खुंटीवर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार सर्वधर्मसमभाव व पुरोगामी आहे. याऊलट शिवसेना व भाजपचा विचार हिंदुत्त्वावादी आहे. आपण आता सत्तेसाठी या सर्वांनी आपापले विचार बाजूला ठेवल्याचे दिसून येत आहे, असे कडू यावेळी म्हणाले.
तसेच, आम्ही स्वतःच्या कष्टाने मोठे झालो. प्रत्येकाची कमांड ही त्याच्या कार्यावर असते. त्यामुळे कुणी दुर्लक्ष केले म्हणून आम्ही बुडणार नाही. मी नाराज असण्याचे कोणतेही कारण नाही.
मी आत्ताच आलूबोंडा खाऊन आलो. मी वर्षभर अभ्यास केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे सांगू शकतात. आम्ही केवळ रांगेत उभे आहोत, असेही बच्चू कडू पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देत म्हणाले.





