Wai News : वाई औद्योगिक क्षेत्रात संतापाचा उद्रेक; ‘ती’ सरकारी योजना फक्त कागदावरच, कामगार हवालदिल
Wai News : वाई तालुक्यातील कामगारांच्या पगारातून ईएसआय कपात होऊनही आरोग्य सुविधांचा वानवा; औषधांच्या प्रचंड तुटवड्यामुळे कामगार संतप्त.

Wai News – वाई तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात राबणाऱ्या हजारो कामगारांच्या आरोग्याशी संबंधित असलेली ईएसआय सेवा सध्या कागदावरच उरली आहे. औषधांचा प्रचंड तुटवडा आणि प्रशासनाचा कारभार यामुळे कामगारांना उपचारांविना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ‘पैसे कापले जातात, पण गोळ्या मिळत नाहीत,’ अशी संतप्त भावना कामगारांमधून व्यक्त होत असून कामगार कल्याण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वाई तालुक्यातील विविध कंपन्यांमधील कामगारांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधी आणि ईएसआय योजनेसाठी ठराविक रक्कम कपात केली जाते. या बदल्यात कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. ईएसआय दवाखान्यांमध्ये साध्या तापाच्या किंवा अंगदुखीच्या गोळ्याही उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कामगार औषधांसाठी दवाखान्याचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, तिथल्या कर्मचाऱ्यांकडून ‘गोळ्या उपलब्ध नाहीत, बाहेरून विकत घ्या,’ असे सांगून रुग्णांची बोळवण केली जात आहे. ज्या कामगारांची आर्थिक स्थिती बेताची आहे, त्यांना खासगी औषध दुकानातून महागडी औषधे खरेदी करणे परवडत नाही. कष्टाच्या पैशातून कपात होऊनही वेळेवर उपचार न मिळणे, ही एक प्रकारची लूटच असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत कामगारांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. या विषयावर ठोस पावले उचलण्याऐवजी अधिकारी मौन बाळगून असल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप आहे.
दरम्यान, ईएसआय दवाखान्यातील औषधांच्या तुटवड्याची तात्काळ चौकशी व्हावी, सर्व आवश्यक औषधे आणि गोळ्यांचा साठा त्वरित उपलब्ध करून द्यावा, कामगारांची होणारी हेळसांड थांबवून त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत. ‘आमच्या पगारातून नियमित पैसे कापले जातात, मग औषधे का मिळत नाहीत? प्रशासनाने हा खेळ थांबवावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.’ असे कामगारांकडून सांगितले जात आहे.





