वाघोली: आयव्ही इस्टेट परिसरात मुख्य रस्त्यावर सांडपाणी; नागरिकांकडून उपाययोजनांची मागणी

वाघोली – वाघोलीतील आय व्ही इस्टेट सोसायटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सांडपाणी आल्याने नागीकांना या पाण्यातून वाट काढून जावे लागत आहे. या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याचा प्रश्न भेडसावू लागल्याने महापालिकेने यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सर्वाधिक सोसायट्यांचा भाग असणाऱ्या वाघोलीतील आयव्ही इस्टेट सोसायटीच्या अलीकडे असणाऱ्या मोकळ्या जागेतून हे सांडपाणी रस्त्यावर येते. या मोकळ्या जागेत सांडपाणी सोडण्यात आल्याचे दिसते. या सांडपाण्याचे तळे येथील रस्त्यावर साचले आहे. नागरिकांना या पाण्यातून तर जावेच लागते. याशिवाय दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागतो आहे.
अनेक दिवसापासून हे सांडपाणी तेथे साचून आहे. या सांडपाण्यामुळे सोसायटी मधील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न ही भेडसावू लागला आहे. दुचाकीचालक व पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. या सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशी सततची मागणी नागरिकांची आहे.
ज्या सोसायट्यांनी सांडपाणी सोडले आहे. त्यांना नोटीस काढली आहे. मी समक्ष पाहणी करणार आहे. ते पाणी बंद न केल्यास सोसायटी वर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक हनुमंत साळवी, यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील म्हणाले, वाघोली मधील अनेक सोसायट्यांच्या परिसरात पाणी साचते. त्या सोसायटी परिसराची पुणे महानगरपालिकेने पाहणी करून त्यांचादेखील पाण्याचा प्रश्न सोडवावा. यासाठी पुणे महानगर पालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.





