Wagholi Police : वाघोली वाहतूक पोलिसांचा कारनामा उघड! १० टन ओव्हरलोड सोडण्यासाठी २७ हजारांची वसुली
Wagholi Police : ओव्हरलोड वाहनांवरून वाघोलीत हायव्होल्टेज ड्रामा; दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

Wagholi Police – वाघोली येथे अवजड वाहतूक कारवाईत वाघोली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेला अनागोंदी कारभार सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर यांच्या समोर (दि.२१) नागरिकांनी स्वतः हजर राहून पुराव्यानीशी उघड केला आहे. वाघोली व लोणीकंद येथील दोन युवकांच्या अवजड वाहतूक वाहनावर वाघोली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर यांच्या आदेशाने वजन करून त्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाकडे (दि.११) सादर करून वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली.
कारवाईत वाघोली वाहतूक शाखेच्या समोरील जागेत जवळपास ९ दिवस कारवाई साठी वाहने उभी होती. दोन वाहनांची कारवाई प्रक्रिया (दि.१८) रोजी पूर्ण झाली. दोन्ही वाहनांचा दंड लाखमोलाचा ठरला आहे. याच कालावधीत एका अवजड वाहनावर वाघोली वाहतूक शाखेच्या वतीने १५०० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली आहे. मात्र, याच कारवाईत अवजड वाहन दाखवू नये यासाठी वाहनचालक प्रतिनिधीकडून वेगळे वाहतूक पोलिसाने २७ हजार ५०० रुपये घेऊन वाहन सोडण्यात आले आहे.
असा पुराव्यानीशी खुलासा सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर यांच्यासमोर पैसे देण्याऱ्या संबंधित व्यक्तींने हजर राहून करून कारवाईतील आर्थिक तडजोडीचा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यावेळेस वाहन क्षमतेपेक्षा १० टन जादा ही बाब असताना देखील अवजड वाहन दाखवू नये यासाठी पोलिसांनी पैशाची मागणी करून बळजबरीने वेगळे पैसे घेऊन वाहन सोडण्यात आले असल्याची कबुली दिल्याने कारवाईत अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. संबधित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर यांच्याकडे केली आहे.





