पुणे जिल्हा | स्वाक्षरी मोहिमेतून राज्य सरकारचे आभार

वाघोली, (प्रतिनिधी) – राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी (दि. 11) पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. पुण्याच्या वाहतूक विकासात या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेट्रो मार्गिकेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. याचे वाघोलीकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले असून स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून आभार मानण्यात येत आहे.
वाघोलीचे समाजसेवक संपत आबा गाडे यांच्या संकल्पनेतून वाघोलीकरांची स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत असून या स्वाक्षरीच्या माध्यमातून मंत्रिमंडळाचे आभार मानण्यात येत आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गणेश तांबे, स्वप्निल मगर, ऋषिकेश दाभाडे, सुधीर तोरडमल, आदी मान्यवर उपस्थित होते. स्वाक्षरी करून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, अतुल सावे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदींचे आभार मानले आहेत.
पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत शासनाकडे हा प्रस्ताव सादर केला होता. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक 1. 12 किलोमीटर लांबीची असून या मार्गिकेवर 2 स्थानके प्रस्तावित आहेत. रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) मार्गिकेची लांबी 11. 63 किलोमीटर असून या मार्गिकेवर 11 स्थानके प्रस्तावित आहेत.
एकूण 12. 75 कि. मी. लांबी आणि 13 उन्नत स्थानके असलेल्या रुपये 3 हजार 756 कोटी 58 लक्ष प्रकल्प पूर्णत्व किंमतीच्या पूर्णतः उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
यात केंद्र व राज्य शासनाचा सहभाग प्रत्येकी रु. 496 कोटी 73 लाख (15. 40 टक्के), केंद्रीय कराच्या 50 टक्के रकमेसाठी केंद्र व राज्य शासनाचे दुय्यम कर्ज प्रत्येकी रु. 148 कोटी 57 लाख (4. 60 टक्के), द्विपक्षीय, बहुपक्षीय संस्थांचे कर्जसहाय्य रु. 1 हजार 935 कोटी 89 लाख (60 टक्के) अशाप्रकारे 3 हजार 226 कोटी 49 लाख रुपये प्रकल्प किंमत केंद्र शासनाच्या अनुदानासाठी पात्र असणार आहे.
मेट्रो मार्गिकांमुळे उपनगरातील नागरिक वेगवान वाहतूकीद्वारे शहराशी जोडले जातील. या मार्गिकांमुळे नागरिकांना वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होऊन शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाचे या निर्णयाबद्दल वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहे -राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच वाघोली





