वाघोली : वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावरील सिद्धीविनायक चौकात एका मद्यधुंद तरुणाने टॉवरवर दोनदा चढून दहशत माजवल्याने खळबळ उडाली. गायरान परिसरातील जागा आपल्या नावावर करून देण्याच्या मागणीसाठी हा तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (दि. ९ ऑगस्ट २०२५) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अमोल रामदास धोत्रे (वय ३२, रा. वाघोली) हा तरुण सिद्धीविनायक चौकातील टॉवरवर अचानक चढला. यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गर्दी जमली. गायरान जमिनीवरील जागा आपल्या नावावर करून देण्याची मागणी करत तो आत्महत्येची धमकी देत होता. पोलिसांनी त्याला खाली येण्याची विनंती केली, तसेच अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. अखेरीस तो खाली उतरला, आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नोटीस बजावल्यानंतर सोडून दिले. मात्र, तेथून परतल्यानंतर अवघ्या काही तासांत, सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास अमोल पुन्हा टॉवरवर चढला. पोलिसांना त्याला खाली उतरवण्यासाठी पुन्हा कसरत करावी लागली. वैद्यकीय तपासणीत तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळले. त्याने दारूच्या नशेत टॉवरवर चढून स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण केला, तसेच सार्वजनिक शांतता भंग करून गोंधळ आणि आरडाओरडा केल्याने वाघोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.