Wagholi Drunk Driving Accident : वाघोलीतील बाईफ रोड परिसरात मद्यधुंद वाहनचालकांचा धुमाकूळ थांबायचं नाव घेत नाही. स्कूलबस चालकाच्या थरारानंतर अवघ्या दोन दिवसांतच पुन्हा एक गंभीर घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून कारचालकाने इतर कार व दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास मुळीक सोसायटीसमोर घडली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि. २८) दुपारी वाघोलीत मद्यधुंद अवस्थेत स्कूलबस चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक देत तीन दुचाकी फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी बसचालक दत्ता वसंत रसाळ (रा. वाघोली) याच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. दरम्यान, हा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी रात्री बाईफ रोड परिसरात आणखी एक मद्यधुंद वाहनचालकाचा थरार घडला. मद्याच्या नशेत असलेल्या टीगोर कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आय-टेन कारला समोरून जोराची धडक दिली. त्यानंतर वॅगनार कारलाही समोरून धडक बसली. याच वेळी एफझेड दुचाकीला कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतरही कारचालक वेडीवाकडी कार चालवत असल्याने परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा करत कार अडवली आणि चालकाला पोलिसांच्या हवाली केले. जखमी दुचाकीचालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार टीगोर कारचालक रजनीकांत श्रीनिवास उपाध्याय (रा. वाघोली) याच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात मद्यधुंद वाहनचालना प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.