वाघोली: भैरवनाथ मंदिर तळ्याकाठी छटपूजा उत्साहात साजरी

वाघोली (पुणे) – येथील भैरवनाथ तळ्याकाठी मावळत्या सूर्याला फळांचा नैवेद्य व अर्घ्य देत उत्तरभारतीय नागरिकांकडून रविवारी (दि.१९) सायंकाळी छटपूजा उत्साहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भैरवनाथ तळ्यावर पुजेसाठी महिला, पुरुष, लहान मुलांपासून वृद्धांनी गर्दी केली होती. छट पूजा साजरी करण्यासाठी वाघोलीसह चंदननगर, खराडी, लोहगाव आव्हाळवाडी, केसनंद, लोणीकंद, भावडी परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांनी भैरवनाथ तळ्याकाठी उपस्थिती लावून घरामध्ये सौख्य नांदू दे अशी प्रार्थना सूर्यदेवाला केली.
भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली. भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात भाविक महिलांनी पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य व फळाचा नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण केला गेला.
यावेळी लहान मोठ्यांसह प्रत्येक उत्तर भारतीयांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता. स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका, पोलीस प्रशासन, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व छट पूजा समितीच्या माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना अडचणी येणार नाहीत याबाबत काळजी घेण्यात आली.





