वाघोली : केसनंद गाव चौक परिसरात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय दुचाकीस्वाराचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी ट्रकचालकासह वाहन मालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२, रा. लाडबा वस्ती, केसनंद) हे आपल्या दुचाकीवरून वाघोलीकडून वाडेबोल्हाईकडे जात होते. याचवेळी यवतकडून लोणीकंदकडे जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक: एमएच १२/व्हीएक्स ११०५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रामदास गायकवाड ट्रकच्या चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाघोली पोलिसांनी ट्रकचालक जनार्दन बाबुराव चव्हाण (वय ६३, रा. यवत) यांच्यावर भरधाव आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच, चव्हाण याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना त्याला वाहन ताब्यात देणाऱ्या डंपर मालक संतोष भंडारे (रा. वढू) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंत गायकवाड यांनी याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, रस्त्यावरील वाहनांच्या बेजबाबदार वर्तनावर नियंत्रणाची मागणी जोर धरू लागली आहे.