Wagholi Bhavdi Road – हवेली तालुक्यातील वाघोली-भावडी रस्ता अवजड वाहतुकीमुळे अक्षरशः चाळण बनला असून तातडीने निधी उपलब्ध करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून ओळख मिळालेल्या या रस्त्याचे काम तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व आमदार बाबुराव पाचरणे यांच्या माध्यमातून पीएमआरडीकडून करण्यात आले होते. मात्र सध्या अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुणे महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. नगरसेवक अनिल सातव यांनीही सुमारे 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून नागरिकांनी या पाठपुराव्याचे स्वागत केले आहे. तरीही प्रत्यक्षात कामाला विलंब होत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे. रस्त्यावर निश्चित वेळेपेक्षा आधीच डंपर व इतर अवजड वाहने धावत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक. यामुळे पर्यायी अंतर्गत रस्त्यांचीही चाळण होण्याची भीती व्यक्त होत आहे. मर्यादित वेळेच्या नियमांचे उल्लंघन होत असून याबाबत वाहतूक शाखेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वाघोली वाहतूक शाखेने अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात तसेच पुणे महानगरपालिकेने तातडीने निधी उपलब्ध करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. “वाघोली-भावडी रस्त्यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे निधी मिळाला होता. मात्र अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. महानगरपालिकेने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा आणि वाहतूक शाखेने अवजड वाहनांवर नियंत्रण आणावे.” – राजेंद्र सातव पाटील, अध्यक्ष, वाघेश्वर देवस्थान, वाघोली अवजड वाहतुकीवर अंकुश आवश्यक निश्चित वेळेपूर्वीच अवजड वाहने रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याने इतर रस्त्यांवरही ताण वाढत असून लवकरच त्यांचीही दुरवस्था होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.