लाहोर : वाघा बॉर्डरवर २०१४ साली झालेल्या आत्मघातकी हल्ला प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या तिघांना पाकिस्तानमधील न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. २०१४ मध्ये वाघा सीमेवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दहशतवादविरोधी न्यायालयाने २०२० मध्ये जमात-उल-अहरार या संघटनेचे सदस्य असलेल्या हसीनउल्लाह हसिना, हबीबुल्ला आणि सय्यद जान उर्फ गजनी या तिघांना दोषी ठरवून पाशीची आणि ३०० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दोषींवर आत्मघाती हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप होता. मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी साक्षीदार हजर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. पण पाच वर्षांहून अधिक काळ चाललेल्या खटल्यात आरोपींविरुद्ध साक्ष देणारे १०० हून अधिक साक्षीदार सरकारी वकिलांनी सादर केले. मात्र न्या. सय्यद शाहबाज अली रिझवी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल रद्द ठरवून तिघांची निर्दोष मुक्तता केली. या हल्ल्याची जबाबदारी बंदी घातलेल्या जुन्दुल्लाह आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या फुटलेल्या गट – जमात-उल-अहरार यांनी स्वतंत्रपणे स्वीकारली.