पुणे | वाडे पुनर्विकासाचा प्रश्न संसदेत मांडणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जुन्या वाड्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये पुरातत्त्व विभागाच्या तरतुदींचा वारसा वास्तूंच्या (अ गट) 100 मीटर परिघातील वाडे आणि जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाला अडथळा ठरत आहे. त्यामुळे वाडे आणि जुन्या इमारतीचा पुनर्विकास रखडला असून, हा प्रश्न संसदेच्या पटलावर ठोसपणे मांडून, त्यावर मार्ग काढू, अशी ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघातील कसबा गणपती मंदिर, रास्ता पेठ, मंगळवार पेठ, नाना पेठ परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोहोळ यांनी मतदारांशी संवाद साधला, तसेच हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासनही दिले. माजी नगरसेवक हेमंत रासने, गणेश बिडकर, योगेश समेळ, राजेंद्र काकडे, संजय मामा देशमुख, स्वरदा बापट,
आरपीआयचे संजय सोनवणे, राजेंद्र कोंढरे, उमेश अण्णा चव्हाण, अरविंद कोठारी, पुष्कर तुळजापूरकर, मदिना तांबोळी, बापू नाईक, निलेश आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय दराडे, शिवसेनेच्या नेत्या सुदर्शना त्रिगुणित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रल्हाद गवळी, गणेश भोकरे, आरपीआयचे मंदार जोशी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, की पुरातन वास्तूच्या परिसरातील नवीन बांधकामांना, तसेच जुन्या बांधकामांच्या पुनर्विकासाला असलेल्या मर्यादा किंबहुना बंदी यामुळे गेली कित्येक दशके एकापाठोपाठ एक जुने वाडे जमीनदोस्त होत चालले आहेत. पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या शिवकालीन, तसेच पेशवेकालीन पुण्याची ओळख असलेल्या या वाड्यांचा पुनर्विकास आवश्यक आहे.
या वाड्यांमध्ये राहणारे बहुसंख्य मूळ मालक आधीच वाडे सोडून अन्यत्र स्थायिक झाले आहेत. जुने भाडेकरू जीव मुठीत धरून राहात आहेत. जाचक आणि अत्यंत त्रासदायक अशा नियमांचे ओझे मागील काही दशकांपासून या परिसरातील नागरिकांना वाहावे लागत आहे.
प्रसंगी नागरिकांना गंभीर आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. देशातील सुमारे साडेतीनशे ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील लाखो बांधकामांचा हा प्रश्न आहे. पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करून नियम शिथिल करण्यासाठी संसदेत पाठपुरावा करणार आहे.





