पुणे | प्रसूतीसाठी जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क

पुणे, {प्रभात वृत्तसेवा } – पुण्यात एका गर्भवतीने प्रसूतीसाठी जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क बजावला, ही बाब उल्लेखनीय ठरली. शालू राठोड या प्रसूतीसाठी त्यांच्या माहेरी चाकण येथे गेल्या होत्या. त्यांचे नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत होते. दरम्यान, प्रसूतीची तारीख १४ मे असतानाही रुग्णालयात जाण्यापूर्वी मतदान करण्याची प्रशासनाकडे इच्छा व्यक्त केली.
यावर जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी या महिलेला चाकण येथून शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील मतदान केंद्रावर आणण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. राठोड यांनी दुपारी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात त्या प्रसूतीसाठी दाखल झाल्या.
शालू राठोड यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची राष्ट्रीय कर्तव्याप्रती असणारी भावना इतरांनाही प्रेरक आहे. त्यांना प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात आले. – अर्चना तांबे, उपजिल्हाधिकारी





