पुणे | मतदारांनो यादीत नाव तपासा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, तसेच मतदार केंद्रांवरही मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्यासाठी २० ऑगस्ट २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
मतदान केंद्रांची पुनर्रचना
नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात. त्या वेळी यादीत नाव नसल्यास ते मताधिकाराला मुकतात. बऱ्याचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते, तिथेच आपले नाव असेल असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात.
मात्र, मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते. या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही, असे समजून ते मतदानाला मुकतात.
ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा
ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार यादीत आपले नाव शोधता येते. ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत एक voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि दुसरा Voter Helpline App या सेवा उपलब्ध आहेत. Voter Helpline App च्या होम पेजवरील Search Your Name In Electoral Roll हा पर्याय निवडल्यानंतर वैयक्तिक तपशील,
मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्यूआर कोड आणि मतदार ओळखपत्र क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात. voters.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाइल नंबर या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.
एसएमएसचाही पर्याय
एसएमएसद्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाइलवरून ‘ECI <स्पेस><मतदान ओळखपत्र क्रमांक>हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही पीडीएफ स्वरूपातील मतदार यादी उपलब्ध असते.
आपल्या मतदारसंघातील यादी भागानुसार ही मतदार यादी डाउनलोड करून आपण त्यात आपले नाव तपासू शकता. यासह जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तिथे उपलब्ध असलेल्या मतदार यादीच्या प्रतीतही आपण आपले नाव तपासू शकतो.





