बिहारमधील मतदारसंख्येत तूर्त ६५ लाखांची घट; प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

पाटणा – निवडणूक आयोगाने शुक्रवारी बिहारमधील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळे तूर्त तरी त्या राज्यातील मतदारसंख्या सुमारे ६५ लाखांनी घटली आहे. अर्थात, पात्र मतदारांना नावे समाविष्ट करण्यासाठी, अपात्र मतदारांची नावे हटवण्यासाठी १ महिन्याची मुदत उपलब्ध आहे. त्यामुळे बिहारमधील नेमकी मतदारसंख्या समोर येण्यास किमान महिनाभराचा अवधी लागणार आहे.
बिहारमधील मतदार याद्या पडताळणीचा पहिला टप्पा नुकताच समाप्त झाला. त्या प्रक्रियेच्या आधारे प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या. प्रक्रिया सुरू होण्याआधी त्या राज्यात जूनमध्ये जवळपास ७.९० कोटी मतदार होते. पडताळणीवेळी मतदारांकडून गणना पत्र भरून घेण्यात आले.
प्रारूप मतदार याद्यांमध्ये ६५ लाखांहून अधिक गणना पत्र समाविष्ट करण्यात आले नाहीत. त्यामुळे तूर्त नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत खाली आली आहे. मतदार संख्या घटू शकण्याची कारणे निवडणूक आयोगाने याआधीच नमूद केली होती.
त्यानुसार, २२ लाखांहून अधिक मतदार मृत्युमुखी पडल्याचे पडताळणी प्रक्रियेवेळी समोर आले. ३६ लाखांहून अधिक मतदार कायमस्वरूपी राज्याबाहेर स्थलांतरित झाले किंवा त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यांवर राहत नसल्याचे स्पष्ट झाले. तर, ७ लाखांपेक्षा जास्त मतदाराची नोंद एकापेक्षा अधिक ठिकाणी आढळली.





