पिंपरी | शहरातील अनेक भागात ना पोहचले वोटर स्लिपा न उमेदवार

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभेसाठी येत्या सोमवारी (दि. १३) मतदान होत आहे. मात्र, यंदा अद्याप अनेक ठिकाणी ना वोटर स्लिपा पोहचल्या न उमेदवार पोहचले. शनिवारी (दि. १८) प्रचाराचा धुराळा खाली बसला, असे म्हणताच येणार नाही. कारण शहरातील अनेक भागांमध्ये कोण उमेदवार उभे आहेत हीच माहिती अद्याप पोहचली नाही.
तसेच निवडणूक विभागाकडून नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन केले जात असताना मतदान करण्यास एकच दिवस शिल्लक असताना अद्याप असंख्य नागरिकांना वोटर स्लीप मिळालेली नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी (दि. १८) प्रचाराची सांगता झाली. मात्र, अनेक भागात उमेदवारच मतदारांपर्यत पोहचलेले नाहीत. त्यामुळे नेमके मतदानाला गेल्यावरच बॅलेटवर समजणार आहे, की कोण कोण लोकसभेच्या रिंगणात नशिब आजमावत आहेत.
शहरातील अनेक भागांमध्ये उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते फिरकले सुद्धा नाहीत. दरम्यान, मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम व अभियान राबविले जातात. तसेच, मतदारांच्या घरी जाऊन त्यांना वोटर स्लीपचे वाटप करण्यात येत आहे.
स्लीप वाटप सुरू असून सर्व मतदारांना त्यांच्या घरी जाऊन स्लीप वाटण्यात येतील, असा दावा निवडणूक विभागाकडून केला जात आहे. मात्र, मतदानासाठी केवळ एकच दिवस शिल्लक असताना अनेक मतदारांच्या घरी अद्याप स्लीप मिळालेली नाही. काहीजण आपले नाव मतदार यादीत आहे का? याबाबत चौकशी करताना दिसत आहेत.
तर, स्लीप मिळाली नसल्याने मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, मतदान केंद्र कोठे आहे, याची चौकशी करत असून नेमके मतदानाच्या दिवशी गोंधळ उडणार नाही, तसेच उगाच केंद्रांवर फेऱया माराव्या लागणार नाही, यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, मतदारांना वेळीच स्लीपा मिळाल्या नाही तर, त्याचा परिणामी मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर भिस्त
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लिंकवर जाऊन अनेकजण आपले नाव यादीत असल्याची खात्री करून घेत आहेत. तर, काही प्रमुख उमेदवारांच्या कार्यकते मोबाइल करून, व्हॉटसअॅपद्वारे तसेच, इतर सोशल मीडियाद्वारे वोटर स्लीप मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत.
नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाकून प्रिन्टरमधून स्लीप काढून मतदारांना देत आहेत. तसेच ज्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत, त्याचा नाव, निशाणी याची माहिती व त्याच उमेदवाराला मत द्या, असा प्रचार करत आहेत. त्यामुळे ज्यांना स्लीपा मिळाल्या नाहीत, अशांची सोशल मीडियावर भिस्त दिसत आहे.





