Junnar : बेल्हे येथे मतदारांचा उत्साह
Junnar :सायंकाळी सव्वा पाच ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू होते. दुपारी दोन नंतर मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर चार वाजल्यानंतर जवळ दोन्ही मतदान केंद्रासमोर ५० पेक्षा जास्त मतदार रांगेत उभे होते.

बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बेल्हे येथील मतदान केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ७१२ मतदारांची नोंद होती, यामध्ये ४८५ पुरुष आणि २२७ महिला मतदारांचा समावेश होता. एकूण ४६५ मतदान झाले, यात ३१९ पुरुष व १४६ महिला पदवीधरांनी मतदान केले. एकूण ६५.३१ टक्के मतदान झाले.
शिक्षक मतदारसंघासाठी ८२.३२ टक्के मतदान
शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ३४५ मतदारांची नोंद होती. यामध्ये १७९ पुरुष आणि १६६ महिला मतदार असल्याची माहिती देण्यात आली. यात १४७ पुरुष शिक्षकांनी तर, १३७ महिला शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८२.३२ टक्के मतदान झाले. सायंकाळी सव्वा पाच ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू होते. दुपारी दोन नंतर मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर चार वाजल्यानंतर जवळ दोन्ही मतदान केंद्रासमोर ५० पेक्षा जास्त मतदार रांगेत उभे होते.
मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त आणि प्रशासनाच्या नियोजनामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.





