मतचोरीचं ट्विट महागात पडलं; नागपूर, नाशिकमध्ये CSDS चे संजय कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले होते. यानंतर देशभरात मतचोरीचे आरोप जोर धरू लागले. निवडणूक आयोगानेही यावर स्पष्टीकरण देत खुलासा केला. आता या प्रकरणी मोठी कारवाई झाली आहे.
“सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीस” (CSDS) चे प्रमुख संजय कुमार यांच्याविरुद्ध नागपूर आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूरच्या रामटेक पोलीस ठाण्यात रामटेक तहसीलदारांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला गेला, तर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लोकसभा 2024 आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान देवळाली आणि रामटेक मतदारसंघातील मतदार याद्यांबाबत हेराफेरी झाल्याची चुकीची माहिती संजय कुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांच्या ट्विटमध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघात लोकसभेत 3,28,053 मतदार असताना विधानसभेत 4,83,459 (47.38% वाढ) आणि हिंगणा मतदारसंघात 3,14,605 वरून 4,50,414 (43.08% वाढ) मतदार झाल्याचा दावा केला होता.

या ट्विटमुळे वाद निर्माण झाला आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर टीका केली. मात्र, तहसीलदारांनी हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याची तक्रार केली. वादानंतर संजय कुमार यांनी ट्विट डिलिट केले.
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींच्या आरोपांचे खंडन करत मतदार यादीतील त्रुटी स्थलांतर किंवा प्रशासकीय चुकांमुळे असल्याचे स्पष्ट केले. दुहेरी मतदान हा गुन्हा असून त्यासाठी पुरावे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.





