केंद्रेकरांची बळजबरीने स्वेच्छानिवृत्ती ! अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई- धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जाणाऱ्या सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नसून त्यासाठी त्यांना भाग पाडण्यात आल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
आतापर्यंत आपल्या कामातून अनेकांना धक्के देणाऱ्या धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सुनील केंद्रेकरांनी घेतलेल्या एका निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. शासकीय सेवेचे दोन वर्षे बाकी असतानाच केंद्रेकरांनी अचानक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शासनाने त्यांचा अर्ज मंजूर देखील केला आहे.
केंद्रेकर मराठवाड्याच्या मातीशी जुळलेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी एक सर्व्हे केला होता, तसेच त्याबाबत सरकारला काही सूचना केल्या. याच्या बातम्या देखील आल्या होत्या. मात्र याचा सरकारमधील लोकांना त्रास झाला, त्यामुळे केंद्रेकरांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. केंद्रेकर स्वाभिमानी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला. ही स्वेच्छानिवृत्ती नाही त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला असेल, असेही दानवे म्हणाले.




