प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज; पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा

Singer Shekhar Ravjiyani | गायक शेखर रवजियानीने हिंदीसह मराठी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहे. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र शेखरने सोशल मीडियाव दोन वर्षांपूर्वी त्याचा आवाज गमावल्याचा खुलासा केला आहे. इतकेच काय तर यामुळे त्याचे करियर संपेल, अशी भीती देखील त्याला होती, असेहीत्याने सांगितले आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
शेखरने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “मी या विषयावर कधीही बोललो नाही. दोन वर्षांपूर्वी माझा आवाज मी गमावला होता. हा खूप भीतीदायक अनुभव होता. मला वाटलेलं की मी पुन्हा कधी गाऊ शकणार नाही. हा खूप कठीण काळ होता. कारण माझ्या कुटुंबाला माझी काळजी वाटत होती. त्यानंतर मी या आजारावर मात करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली. मी कॅलिफोर्नियामधील डॉक्टरांची मदत घेतली. यादरम्यान कोविड असल्याने झूम कॉलच्या माध्यमातून मी उपचार घेत होतो.”
View this post on Instagram
शेखर पुढे म्हणाला की, “डॉक्टरांच्या मदतीने आवाज सुधारण्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली. आवाज ठीक करण्यासाठी कोणताही मार्ग आता माझ्याकडे नाही असं मला सुरुवातीला वाटले होते. पण डॉक्टर एरिन यांनी माझा आत्मविश्वास परत आणला. जेव्हा मी डॉक्टरांना विचारलं की मी पुन्हा गाऊ शकतो का? तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं. पुढे डॉक्टरांच्या मदतीने माझा आवाज हळूहळू बरा व्हायला लागला. यानंतरच मला पुन्हा गाता येईल असे वाटले. ”
शेखरने शेवटी लिहिले की, “जेव्हा मी पुन्हा गाण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा आवाज थोडा फाटल्यासारखा आला. त्यामुळे मी स्वतःच्या आवाजावर नाराज झालो. पण डॉक्टरांची मदत घेऊन हळूहळू मी माझा आवाज सुधारण्याचा प्रयत्न केला. व्हॉईस थेरपी घेण्याची प्रक्रिया पुढे काही दिवस सुरु असणार आहे. काही आठवड्यांनी माझा आवाज आधीसारखा होईल. हा अनुभव मला कायम लक्षात राहील,” असे म्हणत शेखरने दोन वर्षानंतर मोठा खुलासा केला आहे.
हेही वाचा:





