Vi Starts 5G Trial | सध्या देशातील कोट्यावधी ग्राहकांना 5G नेटवर्कचा फायदा मिळत आहे. असे असले तरीही सध्या केवळ Jio आणि Airtel च्या ग्राहकांनाच या सेवेचा फायदा मिळतो. BSNL आणि Vodafone Idea (Vi) या दोन्ही कंपन्या 5जी सेवेबाबत मागे आहेत. मात्र, आता Vi ने देखील 5जी नेटवर्क सेवा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. टेलिकॉम कंपनी Vi ने मुंबईमध्ये 5जी चाचणी सुरू केली आहे. या अंतर्गत ठराविक ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे न देता मोफत अनलिमिटेड हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळत आहे. कंपनीकडून हाय-स्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्याने आता ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कंपनीकडून सध्या 5जी सेवेची चाचणी केली जात आहे. होळीच्या निमित्ताने देशभरातील इतर शहरातही ही सेवा उपलब्ध करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीकडून पुढील काही महिन्यात मुंबईसह दिल्ली, चंदीगड, पटना, बंगळुरूमध्ये हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. त्यानंतर गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमधील इतर शहरातील ग्राहकांनाही या सेवेचा फायदा मिळेल. जर एखाद्या ग्राहकाला Vi Care कडून SMS प्राप्त झाला किंवा त्यांच्या डिव्हाइसवर 5G सिग्नल दिसत असल्यास ते या सेवेचा लाभ घेऊ शकतात. सेवा वापरण्यासाठी यूजरकडे 5G सपोर्ट असलेला मोबाइल आणि 5G-रेडी सिम असणे आवश्यक आहे. या चाचणीदरम्यान ठराविक ग्राहकांना 5G डेटा मोफत वापरता येईल. मात्र, त्या क्षेत्राबाहेर गेल्यानंतर पुन्हा 4G नेटवर्कचा वापर करावा लागेल.