VMD Screen: व्हीएमडी स्क्रीनच्या देखभालीसाठी निधीची वाणवा
VMD Screen

शहरातील चौकांमध्ये बसवलेल्या १६१ व्हीएमडी स्क्रीनपैकी १०० बंद अवस्थेत
VMD Screen: शहरात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले (व्हीएमडी) स्क्रीनपैकी शंभरहून अधिक स्क्रीन सध्या बंद असून, त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेकडे निधीच उपलब्ध नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पातून पालिकेकडे ही यंत्रणा वर्ग केली असली, तरी आवश्यक आर्थिक नियोजन नसल्याने ही सुविधा निष्प्रभ ठरली आहे.
नगरसेवक प्रसन्नजीत भरत वैरागे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रशासनाने ही माहिती दिली. स्मार्ट सिटीअंतर्गत प्रमुख चौकांमध्ये एकूण १६१ व्हीएमडी स्क्रीन बसविले होते. वाहतूक मार्गदर्शन, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि सार्वजनिक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. सध्या १०० हून अधिक स्क्रीन बंद धूळ खात पडून आहेत.
प्रशासनाच्या लेखी माहितीनुसार, स्मार्ट एलिमेंट्स’ प्रकल्प १ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू केला होता. प्रकल्पाच्या पहिल्या पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेकडे होती. १९ सप्टेंबर २०२४ रोजी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरसह व्हीएमडी प्रणाली स्मार्ट सिटीकडून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित झाली.
८ ऑक्टोबर २०२४ रोजी ही जबाबदारी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे वर्ग झाली. मात्र, व्हीएमडी स्क्रीनचे अंतिम हस्तांतरण अद्याप झालेले नाही. महाप्रीत आणि महापालिकेत करार झाला असला, तरी त्यास मुख्य सभेची मंजुरी नसल्याने प्रक्रिया रखडली आहे. त्याचबरोबर आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या स्क्रीन सुरू करण्यात अडचणी आहेत.
प्रशासनाची उडवाउडवी
मॉल आणि व्यावसायिक इमारतींवरील एलईडी जाहिरात फलकांच्या प्रकाशाच्या तीव्रतेबाबत विचारलेल्या प्रश्नावरही प्रशासनाने सर्वसाधारण उत्तर दिले. महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्ह व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियम, २०२२ नुसार कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी उपकरणे उपलब्ध आहेत का, नियमित तपासणी केली जाते का किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किती कारवाई झाली याबाबत ठोस माहिती प्रशासनाने दिलेली नाही.





