Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण संघर्षात रशियाकडून शांतता प्रस्ताव

सेंट पीटर्सबर्ग : इस्रायल आणि इराण दरम्यानच्या संघर्षात मध्यस्थी करण्याची तयारी रशियाने दाखवली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी ही माहिती दिली. सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना इराण-इस्रायल दरम्यानच्या संभाव्य तोडग्यासाठी आपण काही कल्पना सुचवल्या असल्या असून त्यासंदर्भात चर्चा केली जात असल्याचेही पुतीन म्हणाले.
इराणमध्ये रशियाच्या मदतीने अणू उर्जा प्रकल्प विकसित केला जातो आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या रशियाच्या कर्मचाऱ्यांचे रक्षण व्हावे, अशी मागणी रशियाने इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याकडेकेली होती. त्यानुसार या कर्मचाऱ्यांचे रक्षण केले जाईल, अशी हमी इस्रायलने दिली होती. इस्रायलने आपले वचन पाळले असल्याचे पुतीन म्हणाले.
इराणमधील बुशर या बंदरात आणखी दोन अणू भट्ट्या विकसित केल्या जात आहेत. तेथील रशियाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची मागणीही पुतीन यांनी नेतान्याहू यांच्याकडे केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचे मुद्देही आपण उपस्थित केल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाच्या कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्याचे नेतान्याहू यांनी मान्य केले असून ट्रम्प यांनीही आपल्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिल्याचेही ते म्हणाले.
इराण हा रशियाचा मित्र देश असून आपल्या मित्र देशाला रशियाकडून मदत होऊ शकली नाही, हा आरोप पुतीन यांनी सपशेल फेटाळून लावला. इस्रायलमध्ये रशियाचे आणि पुर्वाश्रमीच्या सोव्हिएत रशियातील घटक असलेल्या अन्य देशांमधीलही सुमारे २० लाख लोक रहात आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.
युक्रेन आणखी भूमी गमावू शकेल…
रशिया-युक्रेन संघर्षावर बोलताना जर युक्रेनने शांततेचा प्रस्ताव वारंवार नाकारला, तर युक्रेनला आणखी भूमी गमवावी लागेल, असा इशाराही पुतीन यांनी दिला. रशियाचे सैन्य युक्रेनच्या हद्दीत सुमी प्रांतात १० किलोमीटर आतपर्यंत बफर झोन तयार करत आहे. या प्रांताच्या सुमी या राजधानीकडे आमची वाटचाल सुरू आहे. सीमेवर युक्रेनच्या सैन्याकडून विरोध होतो आहे. सुमी ताब्यात घेण्याची आमची योजना नाही. मात्र तो पर्याय आम्ही सोडून दिलेला नाही. रशिया आणि युक्रेनचे लोक एकच आहेत. मात्र युक्रेनने जर शांततेचा प्रस्ताव वारंवार फेटाळला, तर युक्रेनला आणखी भूमी गगमवावी लागू शकते, असे ते म्हणाले.





