Vladimir Putin : रशियातल्या फुटिरतावादाला पश्चिमेकडून खतपाणी; पुतिन यांचा आरोप

मॉस्को : रशियातल्या फुटिरतावादाला पाश्चात्य देश खतपाणी घालत असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. युक्रेनबरोबर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवरून पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर हा आरोप केला आहे. बेलारुसची राजधानी मिन्स्क येथे युरेशियन इकॉनॉमिक समिटच्या निमित्ताने आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
जेंव्हा इस्लामिक स्टेट रशियाविरधात आक्रमक होती, तेंव्हा त्या दहशतवादी संघटनेकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मॉस्कोमध्ये स्फोट होत होते. तसे हल्ले आजही होत आहेत. पण त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आजही हे बंडखोर दहशतवाद्यांच्या रुपात रशियामध्ये संघर्ष करत आहेत, तेंव्हा देखील तसेच होते आहे. पण रशिया पाश्चात्यांचा एकतर्फी खेळ चालू देणार नाही, असे पुतीन म्हणाले.
नाटोकडून संरक्षण खर्चात जीडीपीच्या ५ टक्के पर्यंत वाढ केली. युरोपातल्या देशांच्या सशस्त्र सामर्थ्यामध्येही वाढ केली जाते आहे. हे सामर्थ्य केवळ रशियाला डोळ्यासमोर ठेवूनच केले जाते आहे. नाटोचे पदाधिकारी केवळ रशियाच्या आक्रमणाचा विचार करूनच अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात. मात्र रशियाला विशेष लष्करी अभियान का करावे लागले, याचा कोणीही विचार करत नाही. युक्रेन संघर्षाची मुळे दशकांपूर्वी जेव्हा रशियाला नाटोच्या विस्ताराबद्दल उघडपणे खोटे बोलले गेले तेंव्हाच रुजली गेली, असेही ते म्हणाले. रशियाला आपल्या सुरक्षेबद्दल वाटणाऱ्या चिंतेकडे नाटोने सातत्याने दुर्लक्ष केल्याचेही पुतीन म्हणाले.
युक्रेनबरोबर नव्याने चर्चेची तयारी
रशिया आणि युक्रेन दोन्ही बाजूंनी ड्रोन हल्ले सुरू असले तरी युक्रेनशी थेट शांतता चर्चेसाठी रशिया तयार आहे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाचे अधिकारी संभाव्य बैठकीच्या वेळेवर चर्चा करत आहेत. या चर्चेमध्ये युद्धबंदीच्या अटी अजेंड्यावर असण्याची शक्यता आहे. यापूर्वी, इस्तंबूलमध्ये झालेल्या चर्चेच्या मागील फेऱ्या कोणतीही प्रगती न होताच संपल्या होत्या. दुसरीकडे, युक्रेनने रात्रीच्या वेळी रशियाची 363 ड्रोन आणि सहा क्षेपणास्त्रांपैकी बहुतेक पाडल्याचे वृत्त आहे. तर रशियाने अनेक प्रदेशांमध्ये युक्रेनची ३९ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.





