मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे मंगोलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत मंगोलिया हा आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा सदस्य देश आहे आणि या न्यायालयाने पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. त्यामुळे मंगोलियामध्ये पुतीन यांना अटक केली जाऊ शकते.
मंगोलियन नेते उखना खुरेलसुख यांची भेट घेण्यासाठी पुतीन तेथे गेले आहेत. पुतीन यांनी युक्रेनमधील युद्ध गुन्हे केल्याच्या आरोपाखाली जवळजवळ १८ महिन्यांपूर्वी त्यांच्या अटकेसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. तेंव्हापासून या न्यायालयाचे सदस्य असलेल्या एखाद्या देशाला पुतीन यांनी प्रथमच भेट दिली आहे.
पुतीन यांना अटक करून हेग येथील न्यायालयाकडे सोपवण्याचे आवाहन युक्रेनने मंगोलियाला केले आहे.मात्र क्रेमलिनला या अटकेची भीती वाटत नसल्याचे रशियातच्या प्रवक्त्याने गेल्या आठवड्यातच म्हटले आहे.
अटक वॉरंट जारी झाल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य संशयितांना ताब्यात घेण्यास बांधील आहेत, परंतु न्यायालयाकडे कोणतीही अंमलबजावणी यंत्रणा नाही.
रशिया आणि चीनमधील विरळ लोकसंख्या असलेला मंगोलिया हा देश, इंधन आणि विजेसाठी रशियावर आणि खाण उद्योगातील गुंतवणुकीसाठी चीनवर खूप अवलंबून आहे. आयसीसीने युक्रेनमधून मुलांच्या अपहरणासाठी पुतीन हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
१९३९ च्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी…
जपानने ईशान्य चीनमधील मंचूरियाचा ताबा घेतला होता. त्यानंतर १९३९ मध्ये तत्कालिन सोव्हिएत आणि मंगोलियन सैन्याने जपानी सैन्यावर विजय होता.
या विजयाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुतीन मंगोलियाला गेले आहेत. मंचुरिया आणि मंगोलिया यांच्यातील सीमा कोठे आहे या वादात काही महिन्यांच्या लढाईत हजारो सैनिक मरण पावले होते.