रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? ट्रम्प -पुतीन यांच्यात होणार महत्त्वाची चर्चा

वॉशिंग्टन – युक्रेनबरोबरचे युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी मंगळवारी (17 मार्च) चर्चा करणार आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फ्लोरिडावरून वॉशिंग्टनला जात असताना विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली.
रशिया – युक्रेन युद्धासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी कदाचित काहीतरी ठोस घोषणा करता येऊ शकेल. गेल्या आठवड्याभरापासून या संदर्भात बरेच काम केले गेले आहे. आता हे युद्ध समाप्त केले जाऊ शकते का, हे आपल्याला तपासून बघता येईल, असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्याशी पुतीन यांची मंगळवारी फोनवरून चर्चा होणार असल्याच्या वृत्ताला रशियाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.
युक्रेनमधील सरकार उलथवून टाकून तेथे रशियाला अनुकूल सरकारची स्थापना करण्यासाठी रशियाने तीन वर्षांपुर्वी युक्रेनविरुद्धचे युद्ध सुरू केले होते. हे उद्दिष्ट रशियाला पुर्णपणे साध्य करता आलेले नाही. मात्र युक्रेनच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर आता रशियाचे नियंत्रण आले आहे. युद्ध थांबवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून भूमी आणि उर्जा प्रकल्पांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. जमीन आणि उर्जा प्रकल्पांच्या वाटणीच्या मुद्यावर ही चर्चा होणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
झेलेन्स्की यांच्याकडून नव्या लष्कर प्रमुखाची नियुक्ती
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी आज युक्रेनच्या चीफ ऑफ जनरल स्टाफ या पदावर जनरल आंद्री नातोव्ह यांची नियुक्ती केली. देशाच्या लष्कराची फेरउभारणी आणि सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून झेलेन्स्की यांनी नवीन लष्कर प्रमुखांची नियुक्ती केली आहे. रशियाविरुद्ध कुर्स्क प्रांतात युक्रेनच्या सैन्याला वेढा घातला गेला आहे. तसेच दोनेत्स्क प्रांतातही युक्रेनच्या सैन्यावर मोठा दबाव येतो आहे. जनरल नातोव्ह हे जनरल अनातोली बारहायलेवेंच यांच्या जागेवर लष्कर प्रमुख झाले आहेत. जनरल बारहायलेवेंच हे फेब्रुवारी २०२४ पासून युक्रेनचे लष्कर प्रमुख होते.





