विठ्ठलवाडी चा सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावणार; जिल्हाध्यक्ष जयप्रकाश सातव पाटील यांची ग्वाही

वाघोली (प्रतिनिधी) – पुणे शहरात दोन दिवस झालेल्या पावसाने वाघोली येथील विठ्ठलवाडी, शौर्य हॉटेल, शिवनेरी हॉटेल, आजूबाजूच्या परिसरात सोसायट्यांमध्ये व मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी एम आर डी ए विभाग, तसेच जयप्रकाश सातव मित्रपरिवार यांच्या माध्यमातून तातडीने पावसाचे पाणी दूर करून नागरिकांना दिलासा देण्यात भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश सातव पाटील यांना यश मिळाले आहे. भर पावसात नागरिकांना केलेल्या मदतीमुळे सातव पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबतीत जयप्रकाश सातव पाटील यांनी सांगितले की अनेक ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये, नागरिकांच्या घरात व पुणे नगर रस्त्यालगत पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. पीडब्ल्यूडी चे उच्च अधिकारी आर वाय पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातील वाहतुकीला तसेच नागरिकांना अडथळा ठरणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी युवराज सातव, पुष्कराज सावंत, नंदकुमार कटके, संदीप कटके, कैलास पवार व पीडब्ल्यूडी चे इंजिनियर व हॉटेल मालक आदींच्या उपस्थितीत जयप्रकाश सातव यांनी विठ्ठलवाडी आणि परिसरातील भागात सांडपाण्याबाबत भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन या पुढील काळात पुणे मनपा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग व पीएमआरडी यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठलवाडी आणि परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावणार सातव असल्याचे सांगितले आहे.





