सासवड, (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी निमित्ताने सासवड येथील पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात तसेच संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी पुरंदरे ट्रस्ट तर्फे पहाटे 5 वाजता महाअभिषेक, महापूजा महाआरती करण्यात आली. प्रवीण खळदकर यांनी पौरोहित्य केले. सकाळी नऊ ते अकरा या काळात अमोल बेलसरे, प्रशांत चिवटे, पुरंदर कला मंचचे सदस्यांनी भक्ती गीते सादर केली. दुपारच्या सत्रात उर्मिला प्रभुणे यांचे प्रवचन आणि शामसुंदर देशपांडे यांच्या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी नामदीप महिला भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम संपन्न झाला तर सायंकाळी उशिराने महाआरती करण्यात आली. कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी मंदिराची आकर्षक सजावट केली होती. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांसह अनेक भाविकांनी दर्शनाचां लाभ घेतला. मंदिरात भाविकांना रोटरी क्लबचे वतीने गुडदाणी वाटप केल्याची माहिती ट्रस्टचे किरण पुरंदरे व नाना पुरंदरे यांनी दिली. दिवसभरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतल्याचे किरणं पुरंदरे यांनी सांगितले. म्हणून विसावा विठ्ठल नाव संत सोपानकाका महाराजांनी संजीवन समाधी घेतेवेळी प्रत्यक्ष श्री पांडुरंग येथे आले होते. त्यावेळी क-हे काठी विश्रांतीसाठी थांबले होते, त्या ठिकाणी मंदिर बांधले व विठ्ठलानी विश्रांती घेतली म्हणून विसावा विठ्ठल असे नाव मंदिरास मिळाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.