Vithoba Temple : आता बीव्हीजी ग्रुप पुरवणार विठ्ठलाच्या मंदिराला सुरक्षा

पंढरपुर : विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट बीव्हीजी ग्रुपला देण्यात आले आहे. आजपासून मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी या ग्रुपची असणार आहे, याबाबतची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यापूर्वी ठेका असणाऱ्या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता.
यानंतर मंदिरांनी निविदा प्रसिद्ध केल्यावर देशभरातून आठ एजन्सीने यासाठी दर दिले होते. विशेष म्हणजे या आठही एजन्सीने सर्विस चार्जेस म्हणून 3.85 इतका समान दर कोट केला होता. बीव्हीजीला या कंत्राटाचे 5 कोटी 77 लाख रुपये मिळणार आहेत. यानंतर समितीने निविदेत दिलेल्या नियमानुसार मार्किंग सिस्टीम ठरवली होती. यात आठ पैकी तीन एजन्सींना शंभर पैकी शंभर गुण मिळाले. यानंतर मंदिराला 300 पेक्षा जास्त माणसे पुरवणे या अटीमध्ये यातील दोन एजन्सी पात्र झाल्या.
अखेर शेवटच्या अटी नुसार या दोन मधील टर्नओव्हर मध्ये बीव्हीजी ही एकमेव एजन्सी पात्र झाली आणि त्यामुळे विठ्ठल मंदिराचे हे कंत्राट बीव्हीजी कंपनीला देण्यात आल्याचे राजेंद्र शेळके यांनी सांगितले. आता आजपासून मंदिरासाठी जवळपास २२० सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम बीव्हीजी करणार असून यांचा वापर मंदिर दर्शन रांग आणि मंदिर परिसरातील परिवार देवता येथे केला जाणार आहे. याशिवाय यात्रेसाठी लागणाऱ्या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारी ही बीव्हीजी वर असणार आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या बीव्हीजी साठी ही समितीची नियमावली असून या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजीवर असणार आहे.




