Vishal Dadlani: मंत्र्याच्या ओळखीचा वापर पडला महागात, विशाल ददलानींनी गायकासह मंत्र्यालाही केलं ब्लॉक
विशाल म्हणाले, “नव्या गायकांसाठी एक सल्ला कृपया कोणत्याही मंत्री, नेता किंवा त्यांच्या सेक्रेटरीकडून ओळखीचा वापर करून मला फोन करवण्याचा प्रयत्न करू नका.” असं केल्यास आपल्याला भेटण्याची संधी कायमची संपते, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

Vishal Dadlani: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांनी संगीत क्षेत्रात चालणाऱ्या ओळखीच्या जोरावर पुढे जाण्याच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी नव्या गायकांना स्पष्ट इशारा दिला आहे.
विशाल म्हणाले, “नव्या गायकांसाठी एक सल्ला कृपया कोणत्याही मंत्री, नेता किंवा त्यांच्या सेक्रेटरीकडून ओळखीचा वापर करून मला फोन करवण्याचा प्रयत्न करू नका.” असं केल्यास आपल्याला भेटण्याची संधी कायमची संपते, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
![]()
मंत्री आणि गायक दोघांनाही केलं ब्लॉक
विशाल यांनी पोस्टमध्ये एक प्रसंग सांगितला. अलीकडेच एका गायकाने मंत्र्याच्या ओळखीचा आधार घेऊन आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.
यामुळे नाराज झालेल्या विशाल यांनी त्या मंत्र्याला आणि संबंधित गायकालाही थेट ब्लॉक केलं. “आता ते कितीही चांगले गायक असले, तरी मला त्यांच्यासोबत काम करायची अजिबात इच्छा नाही,” असंही त्यांनी लिहिलं.
“स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवा”
विशाल ददलानी पुढे म्हणाले, “स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि संयम ठेवा. जर तुम्ही खरंच चांगले असाल, तर तुमची वेळ नक्की येईल. ओळखीचा मार्ग स्वीकारू नका. ही जुनी आणि कंटाळवाणी पद्धत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःवरचा विश्वास नसल्याचं दाखवते.”
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
विशाल यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अनेकांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत लिहिलं, “सर, माझ्या मॅनेजरने ट्रू कॉलरवर स्वतःचं नाव ‘मंत्री’ ठेवलं आहे, कृपया त्यांना अनब्लॉक करा.”

Vishal Shekhar
विशाल-शेखर जोडीसाठी प्रसिद्ध
विशाल ददलानी हे विशाल–शेखर या लोकप्रिय संगीत जोडीसाठी ओळखले जातात. ‘ओम शांती ओम’, ‘वॉर’, ‘रॉकस्टार’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. ते रॉक बँड पेंटाग्रामचेही प्रमुख गायक आहेत.



