Virat Kohli T20I Retirement : विराट कोहली टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेणार? नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या

Virat Kohli will return from T20I retirement : भारतीय क्रिकेटच्या स्टार खेळाडू विराट कोहलीने अलीकडेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता त्याने एक नवीन गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जर भारत २०२८ च्या ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचला तर, तो त्या एका सामन्यासाठी निवृत्तीतून बाहेर पडण्याचा विचार करू शकतो, असे संकेत कोहलीने दिले आहेत. कोहलीच्या या विधानामुळे भारताच्या ऑलिम्पिक पदकांच्या आशांना उंचावल्या आहेत.
टी-२० विश्वचषकानंतर घेतला होता निवृत्तीचा निर्णय –
टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनल सामन्यानंतर विराट कोहलीने या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या विश्वचषकात भारताने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून विजय मिळवला आणि या विजयानंतर कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या निर्णयानंतर क्रिकेट जगतात खूप खळबळ उडाली होती, पण आता त्याच्या पुनरागमनाची चर्चेने एक नवीन आशा निर्माण झाली आहे.
ऑलिम्पिकमध्ये परतण्याची शक्यता –
विराट कोहली म्हणाला, “जर भारत २०२८ मध्ये ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत पोहोचला, तर मी त्या एका सामन्यासाठी निवृत्तीतून बाहेर पडण्याचा विचार करू शकतो.” हे विधान भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक मनोरंजक संकेत असू शकते. कोहलीचा असा विश्वास आहे की ऑलिंम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी खूप खास असेल आणि त्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो. क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात यश मिळवणारा विराट कोहली ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला पदक मिळवून देण्यासाठी सज्ज आहे.
विराट कोहलीने फिटनेसवर का लक्ष केंद्रित केले?
विराट कोहलीचा फिटनेस प्रवास नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. कोहलीला सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला, परंतु त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करून त्याने जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंमध्ये आपले स्थान निर्माण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संघर्षांनंतर कोहलीने आपली जीवनशैली कशी बदलली आणि फिटनेसला आपले प्राधान्य कसे दिले हे देखील सांगितले.
विराट कोहली म्हणाला, “काही कठीण दौऱ्यानंतर माझ्यात बदल झाला. जेव्हा मी पाहिले की विदेशातील खेळाडू आमच्यापेक्षा जास्त काळ मैदानावर टिकून राहतात, तेव्हा मी स्वत;मध्ये बदल करण्याचे ठरवले. त्यावेळी माझ्या आईलाही माझ्या तंदुरुस्तीची काळजी वाटत होती, पण मी तिला समजावून सांगितले की हा बदल माझ्यासाठी चांगला आहे.”





