Virat Kohli : आयपीएल 2025 स्पर्धेत विराट कोहली मोडणार ‘हे’ 5 मोठे विक्रम

क्रीडा रसिकांची आता उत्सुकता संपली आहे. थोड्याच वेळात आयपीएलच्या 18 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. या सिझनमधील पहिला सामना आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात पार पडणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डनवर होणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीला काही विक्रम रचण्याची संधी आहे. या विक्रमांपासून तो अवघे काही पाऊले दूर आहे. चला तर मग जाणून घेऊया अश्या 5 विक्रमांबद्दल…
1) शतकांचा विक्रम
विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये (आयपीएल+आंतराष्ट्रीय) एकूण 9 शतके झळकावली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम 11 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीला या हंगामात आणखी तीन शतके झळकावली तर दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. या यादीत ख्रिस गेल 22 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.
2) 13 हजार धावांचा टप्पा
विराट कोहलीने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 12886 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त 114 धावांची आवश्यकता आहे. असं झालं तर टी20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज होईल. या यादीमध्ये कोहलीनंतर रोहित शर्मा 11830 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये ख्रिस गेल (14562), अॅलेक्स हेल्स (13610), शोएब मलिक (13537) आणि किरॉन पोलार्ड (13537) हे विराट कोहलीच्या पुढे आहेत.
3) सर्वाधिक कॅच
आयपीएलमध्ये सर्वाधिक आउटफिल्ड कॅच घेण्याचा विक्रम आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने 184 सामन्यांमध्ये 118 झेल घेतले आहेत. तर कोहलीने आतापर्यंत 114 झेल घेतले आहेत. डिव्हिलियर्सला मागे टाकण्यासाठी कोहलीला आणखी 5 झेलची आवश्यकता आहे.
4) 1000 चौकार आणि षटकार
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने 1000 चौकार आणि षटकार मारलेले नाहीत. हा विक्रम गाठण्यासाठी कोहलीला आणखी 23 चौकार किंवा षटकारा मारावे लागतील. आतापर्यंत त्याने 252 सामन्यांमध्ये 977 चौकार (705 चौकार, 272 षटकार) मारले आहेत.
5) सर्वाधिक अर्धशतके
आयपीएलमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने 66 वेळा हा विक्रम केला आहे.तर कोहलीने 63 वेळा 50+ स्कोअर केला आहेत. वॉर्नरला मागे टाकण्यासाठी कोहलीला या सिझनमध्ये ४ अर्धशतके करावे लागतील.





