Virat Kohli | क्रमवारीत विराट कोहलीची प्रगती

दुबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत एका स्थानाने प्रगती केली आहे. या क्रमवारीत आता तो चौथ्या स्थानी आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी केलेल्या लोकेश राहुलची मात्र, एका स्थानाने घसरण झाली असून तो फलंदाजाच्या यादीत आता पाचव्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान 892 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचा ऍरन फिंच या क्रमवारीत 830 गुणांसह दुसऱ्या तर, पाकिस्तानचा बाबर आझम 801 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीचे 762 गुण झाले आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानची घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्मी 733 गुणांसह अव्वल स्थानी तर, रशिद 719 दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. तर, न्यूझीलंडच्या मिचेल सॅन्टनरने सातवे स्थान राखले आहे. या क्रमवारीत बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानी आहे. तर, पहिल्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा महंमद नबी पोहोचला आहे. आयसीसीच्या सदस्य देशांच्या खेळाडूंनाही पात्रता स्पर्धेनंतर ताज्या क्रमवारीत स्थान देण्यात येते व त्यात अफगाणिस्तानने सातत्याने स्थान राखले आहे.





