Virat Vaibhav Video : आयपीएल संपताच विराट कोहलीने वैभव सूर्यवंशीला दिला कानमंत्र; म्हणाला, “आता फक्त तू…’, पाहा VIDEO
Virat Vaibhav Video : त्यावेळी विराटने नक्की काय सल्ला दिला होता, याचे गुपित अखेर आरसीबीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे उघड झाले आहे.

Virat Kohli Advice To Vaibhav Sooryavanshi Video : आयपीएल २०२६ चा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) ऐतिहासिक विजयाने संपला असला, तरी मैदानाबाहेरील काही खास क्षणांची चर्चा अजूनही रंगत आहे. ३१ मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरातवर ५ गडी राखून मात करत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर विराट कोहली आणि वंडर बॉय वैभव सूर्यवंशी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये विराट वैभवला सल्ला देताना दिसत होता. त्यावेळी विराटने नक्की काय सल्ला दिला होता, याचे गुपित अखेर आरसीबीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे उघड झाले आहे.
विराटचा वैभवला कानमंत्र: “तुझी बॅट आणि फक्त तू…”
बुधवारी आरसीबीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर विराट आणि वैभव यांच्यातील या खास संवादाचा व्हिडिओ शेअर केला, जो काही क्षणांतच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये विराट कोहली माजी कर्णधाराच्या आणि एका मोठ्या भावाच्या भूमिकेत वैभवला मोलाचा सल्ला देताना दिसला.
𝗧𝗵𝗲 𝗺𝗮𝗻 𝘄𝗵𝗼 𝗺𝗮𝗱𝗲 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗰𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁 𝗳𝗲𝗮𝗿𝗹𝗲𝘀𝘀 🤝 𝘁𝗵𝗲 𝗯𝗼𝘆 𝘄𝗵𝗼 𝗯𝗮𝘁𝘀 𝗳𝗲𝗮𝗿𝗹𝗲𝘀𝘀 🫶💪
The best piece of advice the 15-year old Vaibhav Suryavanshi could get! And who better than Virat Kohli to help fuel his fire in the right direction.… pic.twitter.com/MUqCRBo0la
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 3, 2026
विराट वैभवला म्हणाला, “तुला इथून अजून खूप पुढे जायचं आहे. आतापर्यंत तू जी मेहनत घेतली आहेस, केवळ त्याच्याच मुळे हे सगळं यश शक्य झालं आहे. आता इथून पुढे कोण तुझ्याबद्दल काय बोलतंय, याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस; सगळं सोडून दे. फक्त तुझी बॅट आणि तू… याच गोष्टीवर स्वतःला केंद्रित ठेव.” संभाषणाचा शेवट करताना विराटने हसत हसत वैभवशी हात मिळवला आणि एक अस्सल बिहारी स्टाईल डायलॉग मारला— “एक बिहारी सब पे भारी, फिर खतम गेम…!”
तरुण वयातील यशानंतर पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला!
अवघ्या १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मधील सर्वात मोठा स्टार ठरला. त्याने राजस्थान रॉयल्सला प्ले-ऑफ आणि फायनलपर्यंत मजल मारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. वैभवने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर एकाच हंगामात ऑरेंज कॅपसह पाचही प्रतिष्ठित आणि मोठे पुरस्कार जिंकून इतिहास रचला. या सुरुवातीच्या अफाट यशानंतर वैभवचे लक्ष विचलित होऊ नये, म्हणून विराटने त्याला सुरुवातीच्या यशावर समाधानी न राहता आपला पाया अधिक मजबूत करण्याचा आणि सातत्याने कठोर मेहनत सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. विराट कोहलीसारख्या जागतिक दिग्गजाकडून मिळालेला हा कानमंत्र वैभवच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिशादर्शक मानला जात आहे.





