Virat Kohli : एकदिवसीय क्रमवारीत कोहली अव्वल

दुबई – आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कोहलीचे 870 गुण बनले आहेत. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर असून, पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. लोकेश राहुलने 31 व्या स्थानावरून 27 व्या स्थानी झेप घेतली आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने 42 वे स्थान मिळवले असून, सध्या भरात असलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्यांदाच टॉप-100 मध्ये स्थान मिळवले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेमधून विश्रांती घेतलेला बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या नावावर 690 गुण आहेत. भुवनेश्वर कुमारने 11 वे स्थान पटकावले आहे. शार्दुल ठाकूर 80 व्या स्थानी आहे.
टी-20 क्रमवारीत राहुल आणि कोहली अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर आहेत. अष्टपैलूंच्या क्रमवारीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. मात्र, कसोटी क्रमवारीत भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रविचंद्रन अश्विनने दुसरे स्थान कायम राखले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा तिसऱ्या, तर अश्विन चौथ्या क्रमांकावर आहेत.





