शिर्डी : साईबाबा संस्थानने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भक्तांना अनोखी भेट दिली आहे. तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घेत असलेल्या सामान्य साईभक्त जोडीला आता साईबाबांच्या आरतीला अग्रभागी उभे राहण्याचा मान दिला जाणार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर घेतलेल्या या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबा संस्थानने सामान्य साईभक्तांना अनोखी भेट दिली आहे. दररोज होणा-या साई बाबांच्या आरतीला एका भाग्यशाली जोडीला आरतीला उभ राहण्याचा मान मिळणार आहे. साईबाबांची माध्यान्ह, धूप आणि शेज आरतीला भाग्यशाली जोडी सर्वात पुढे उभी असणार आहे. आरती सुरू होण्यापुर्वी सामान्य दर्शनरांग थांबवली जाते. यावेळी जी जोडी सर्वात पुढे असेल त्यांना याचा लाभ मिळणार आहे. साईबाबांच्या माध्यान्ह आरतीपासून या योजनेची आज सुरुवात करण्यात आली. यावेळी झाशी येथील मनिष रजक हे दाम्पत्य पहिले भाग्यशाली ठरले. त्यांना आरतीला अग्रभागी उभं करण्यात आल्याने हे भक्त भारावून गेले होते. दर्शनासाठी तब्बल चार तास हे दाम्पत्य रांगेत होते आणि रांगेतून आरतीच्या वेळी घाबरत पोहोचल्यानंतर त्यांना जो मान मिळाला त्यानंतर या दाम्पत्याने आपला आनंद बोलून दाखवला. यापूर्वी फक्त सशुल्क पासधारक, दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच ही संधी दिली जात होती. त्यामुळे आरतीसाठी सामान्य भक्ताला समोर उभं राहणे दुरापास्त होते. मात्र संस्थानने सुरू केलेल्या या अनोख्या योजनेमुळे भाग्यशाली सामान्य साईभक्तालाही साईबाबांची आरती करताना व्हीव्हीआयपीचा दर्जा मिळाला आहे. दरम्यान, साईबाबांना 13 लाख 30 हजार रुपये किमतीचा सुवर्ण हार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्पण करण्यात आला आहे. साईभक्त बबिता टीकू आणि परिवाराकडून साईचरणी हे सुवर्ण दान अर्पण करण्यात आले आहे. साई मूर्तीला आज हा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हार परिधान करण्यात आला. साई संस्थानकडून दानशूर साईभक्तांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर साईबाबांना वर्षाच्या सुरुवातीलाच सुवर्ण दान अर्पण करण्यात आले आहे.