Pakistan News : पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार भडकला

पेशावर : पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात सशस्त्र हल्लेखोरांनी लष्करी वाहनांच्या ताफ्यावर केलेल्या गोळीबारात जिल्ह्याचे उपायुक्त जखमी झाले आहेत. याच जिल्ह्यात दोन आदिवासी समुदायांमध्ये भडकलेल्या हिंसाचारानंतर शस्त्रसंधी करार घडवून आणला गेला होता. जखमी उपायुक्तांना हेलिकॉप्टरने पेशावरला हलवण्यात आले आहे.
लष्करी वाहनांवर गोळीबार झाल्याने कुर्रम जिल्ह्याचे उपायुक्त जावेदुल्ला मेहसूद आणि अन्य पाच जण जखमी झाले. डोंगराळ खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावरच्या नैऋत्येस सुमारे २०० किमी अंतरावर बागानजवळील कोजलाई बाबा गावात ही घटना घडली. स्थानिक गावकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती.
निदर्शने करणाऱ्या या गावकऱ्यांशी वाटाघाटी सुरू असतानाच हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात फ्रंटियर कॉर्प्सचा एक कर्मचारी, एक पोलीस आणि तीन नागरिकही या हल्ल्यात जखमी झाले. पेशावर-सद्दा-थाली-पाराचिनार रस्त्यावरील वाहतूक गेल्या ८५ दिवसांपासून खंडीत आहे. म्हणून तेथे अन्नपदार्थ, औषधे आणि अन्य मदतीचे साहित्य घेऊन वाहनांचा ताफा रवाना केला गेला होता. त्या वाहनांची व्यवस्था बघण्यासाठी उपायुक्त मेहसूद गेले होते.
कुर्रम जिल्ह्यात अलिझाई आणि बगारी या आदिवासी समाजातील दोन समुदायांमध्ये २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान झालेल्या हिंसाचारात १९३ जण ठार झाले होते. बुधवारी या दोन्ही समुदायांमध्ये शस्त्रसंधी करार करण्यात आला होता.





