पुणे | जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, आमदार धंगेकर यांच्यावर गुन्हा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून मतदारांना प्रलोभन दाखवण्यात येत असल्याचा आरोप करून धंगेकर यांनी हे आंदोलन केले होते.
याप्रकरणी रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय माने, साकीब आबाजी, संतोष पंडित, अनिल सातपुते आदी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अभिजित बालगुडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचा आदेश लागू आहे. रविवारी (१२ मे) रात्री धंगेकर यांनी हे आंदोलन केले. त्या वेळी पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. धंगेकर यांच्या ठिय्या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. सहकानगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
प्रलोभन दाखवणारे मोकळे; गुन्हे आमच्यावर दाखल
प्रलोभन दाखवण्यात येत असल्याची तक्रार घेऊन आम्ही सहकारनगर पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्या वेळी तेथे भाजपचे माजी नगरसेवक आणि दोनशे ते तीनशे कार्यकर्ते होते. त्यांना पोलिसांनी माेकळे सोडले. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केला.





