विनय शर्माचा मानसिक रुग्ण असल्याचा दावा फेटाळला

नवी दिल्ली – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय कुमार शर्मा याचा मानसिक रुग्ण असल्याचा दावा दिल्लीतील न्यायालयाने फेटाळला आहे. मानसिक उपचरांची आवश्यकता असल्याचा दावा विनय शर्माने केला होता. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी विनयची याचिका फेटाळून लावली.
विनयच्या डोक्याला आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तसेच त्याला मानसिक असमतोल, मनोरुग्ण आणि स्क्रिझोफ्रेनिया झाला असल्याचे त्याच्या याचिकेमध्ये म्हटले होते. मात्र त्याचा दावा म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याचे तिहार कारागृह प्रशासनाने म्हटले आहे.
विनयने जाणीवपूर्वक स्वतःला इजा करून घेतल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसते आहे. त्याला झालेली इजा मानसिक आजारपणातून झालेली नाही, असे तिहार प्रशासनाने न्यायालयात सांगितले.
चारही दोषींची मानसिक आरोग्याची चाचणी दररोज करण्यात येते आहे आणि सर्वांचे मानसिक आरोग्य सुस्थितीत असल्याचे तिहारच्या मानसोपचारतज्ञांनी सांगितले.





